जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥

उत्सव

१) चैत्र शुध्द प्रतिपदा(गुढीपाडवा)

   ह्या दिवशी अभिषेक, महापुजा देवास नवे वस्त्र अर्पण करुन मंदिरावर नवा ध्वज उभारुन महाआरती होऊन प्रसाद वाटप होतो.

२) चैत्र शुध्द नवमी - श्री राम नवमी

   ह्या दिवशी पहाटेस श्री समर्थ भक्‍त टाकळी मंदिरातील श्री समर्थांची कुबडी व पादुका घेऊन श्री कळाराम मंदिराच्या महाव्दारात जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करत आत प्रवेश करतात. तिथे काळाराम मंदिराचे पुजारी सर्वांचे स्वागत करतात. कुबडी व पादुका गाभाऱ्यात नेऊन श्री रामाचे दर्शन पुजा होते. त्या निमित्ताने श्री समर्थ प्रथम आपले वाढ दिवसाचे दिवशी श्रीरामाच्या दर्शनास येतात हा त्यामागील उद्देश. सर्व नंतर टाकळी मंदिरात आल्यावर देवाची महापुजा अभिषेक दुपारी १२ वा. जन्मोत्सव, महाआरती व प्रसाद वाटप होतो.

३) चैत्र पौर्णिमा - श्री हनुमान जयंती

   पहाटेस महापुजा होऊन सुर्योदयास जन्मोत्सव, महाआरती प्रसाद वाटप होतो. दु.१२.०० वा. महाआरती नंतर भंडारा आयोजित करण्यात येतो. त्या निमीत्‍ताने प्रवचने, व्याख्याने, भजने, किर्तने आयोजित करण्यात येतात.ह्‍याच दिवशी शिवाजी महाराजांचा निर्याण दिन असल्याने त्यांच्या प्रतिमेस हार घालून पुजन करण्यात येते.

४) माघ शुध्द सप्तमी - रथ सप्तमी

   सन १६२० रथसप्तमीस श्री समर्थांनी टाकळी येथील गोदावरी नंदिनीच्या संगमात कमरेभर पाण्यात उभे राहून पूरश्चरणास प्रारंभ केला. ह्याचे स्मरणार्थ श्री समर्थ भक्‍त सकाळी टाकळी मंदिरातून कुबडी व पादुका घेऊन श्रीराम नामाचा जप करीत मनाचे श्लोक म्हणत वाजत गाजत संगमावर जातात. तिथे कुबडीस, पादुकांना अभिषेक, आरती होऊन ११३ वेळा सामूहिक रामनामाचा जप होतो. नैवेद्य दाखवून पहिला नैवेद्य पाण्यातील माशांना (जलचर प्राण्यांना) देण्यात येतो. प्रसाद वाटप होते. नंतर पुन्हा कुबडी व पादुका मंदिरात स्थानापन्‍न होतात. पुजा होऊन प्रसाद वाटप होतो.

५) माघ वद्य नवमी - दास नवमी

   शनिवार शके १६०४ (१२ फेब्रुवारी १६८२) रोजी दोन प्रहरी श्री समर्थ आसनस्थ हो‌ऊन तीन वेळा श्रीरामनामाचा जयजयकार करीत, सातरा येथील सज्‍जनगडावर सर्व रामदासी, रामभक्‍तांचा निरोप घेत ध्यानस्थ हो‌ऊन श्रीराम चरणी लीन झाले. ह्‍या तिथीस दासनवमी असे म्हणतात. ह्याचे स्मरनार्थ दासनवमीस टाकळी मंदिरात देवास अभिषेक, महापुजा, १२ वा. महा‌आरती हो‌ऊन भंडारा आयोजित करण्यात येतो.
    माघ व.९ ला सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे गड जींकून धारातिर्थी पडले, त्या स्मर्णार्थ त्यांच्या प्रतीमेस पुष्‍पाहार घालून पूजन करुन पोवाडा सादर केला जातो.

६) श्री उध्दव स्वामी पुण्यतिथी

   फाल्गुन शुध्द प्रतिपदा शके १६६१ सन १७०९ वयाच्या ८६ व्या वर्षी टाकळी येथे सूर्योदयास टाकळी मठाचे पहिले मठाधिपती श्री समर्थांचे पहीले शिष्य श्री उध्दव स्वामी श्री समर्थ चरनी लीन झाले. त्या स्मणार्थ अभिषेक पुजा, प्रसाद वाटप होतो.