जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥

श्री समर्थ रामदास चरित्र आणि टाकळी मठाचा इतिहास


   श्री. सूर्याजीपंत ठोसर आणि त्यांच्या पत्‍नी सौ. राणुबाई हे पती पत्‍नी जांब ता. घनसंगवी जि.जालना ह्या गांवी देव धर्माचे आचरण करीत त्यांना मिळालेल्या बारा गावांचे जोशी व कुलकर्णीपदाचे सचोटीने कार्य करत, गोर गरीबांना यथासांग मदत करीत, त्यांचा दिनक्रम आनंदाने चालला होता. त्यांच्या घराण्यात २३ पीढ्यांपासून सूर्य उपासन होत होती. ते दोघे निष्ठापूर्वक करीत असलेल्या सत्कृत्यामुळे व २३ पिढ्यांनी केलेल्या सूर्य उपासनेच्या पुण्याईने त्यांना दोन पुत्र झाले. पहिला पुत्र गंगाधर (श्रेष्ठ) हा सूर्यनारायणाच्या आशिर्वादाने मार्गशिर्ष व. १३ सन १६०५ व दुसरा पुत्र नारायण (श्री समर्थ रामदास) हा श्री हनुमंताचा अंश असलेला, ह्याचा जन्म चैत्र शु.९ (रामनवमी) सन १६०८ मध्यनीस झाला.

   दोन मुलांचा सांभाळ त्यांचे कोडकौतुक करण्यात, त्यांचे हट्ट पुरविण्यात दोघा पती पत्‍नीस दिवस पुरत नव्हता. मोठा गंगाधर शांत, संयमी तर लहाना नारायण खोडकर व अचपळ होता. एकदा आईवर रागाऊन नारायण दिवसभर गायब झाला. शोध करता करता संध्याकाळी अंधारात राणूबाईंना नारायण ध्यानस्त बसलेला आढळला. त्यांनी विचारले "अरे नारायण अंधारात काय करतो?" नारायण उत्तरला "आई चिंता करतो विश्‍वाची" हे उद्‍गार निघाले वयाच्या आठव्या वर्षी. नंतर मात्र नारायण शांत झाला. मार्गशीर्ष शु.९ सन १६१५ रोजी दोघा पुत्रांचे पित्याचे छत्र हरपले. जांब येथील श्री मारुतीरायांच्या मंदिरात श्रावण शु.८ सन १६१६ नारायणास प्रथम दृष्टांत झाला. त्याचे पुढील आयुष्य नियतीने धर्मकार्यासाठीच ठरविले आहे हे फक्‍त नारायणाला आणि श्रेष्ठांनाच माहिती होते. केवळ आईच्या प्रेमाखातर आणि "सावधान" म्हणोस्तर बोहल्यावर उभा राहिल असे तिला कबूल केल्याप्रमाणे जांब गांवाजवळील आसनगावचे मामा भानजी बोधलापुरकर यांची कन्या गोदावरी म्हणजे मामेबहीणीशीच विवाह करण्यास नारायणाने होकार दिला. फाल्गुन शु.८ शके १५४१ रोजी गोरज मुहुर्तावर विवाह मुहुर्त ठरविण्यात आला त्याप्रमाणे सर्व तयारी पूर्ण झाली. घटिका हळूहळू पाण्यात जाऊ लागली. व्दिज मंगलाष्टके म्हणू लागले. त्यांची "सावधान" "सावधान" ही वाक्य नारायणानी ऐकली आणि त्या शब्दांच्या अर्थाप्रमाणे सावध होऊन विवाह मंडपातून बोहल्यावरुन सायंप्रकाशात गर्दीतून एका वस्त्रानिशी नाहीसा झाला. रात्रभर गावाबाहेर मुक्‍काम करुन दुसऱ्या दिवशी पहाटेस गोदावरीच्या काठाकाठाने चालू लागला. दिवसभर चालणे रात्री कुठल्यातरी मंदिरात आसरा घेणे, जेवायला मिळाले तर मिळाले नाहीतर तसेच चालणे अशा दिनक्रमाने साधारण आठ - दहा दिवसात पंचवटी नाशकास आला. बारा वर्षे दिवसरात्र, क्षणोक्षण ज्याचा ध्यास लागला होता त्या दैवताचे त्या श्रीरामांच्या चरणकमलाचे नारायणास दर्शन झाले. त्यांच्या चरणावर माथा ठेऊन आनंद अश्रुंनी त्यावर अभिषेक केला. दैवताला आपला आवडता भक्‍त आणि त्या दासाला आपले आराध्य दैवत भेटले. परवाणी श्री रामरायांनी छोट्या नारायणास त्याचे पुढील कार्याचे मार्गदर्शन केले आणि श्री मारुतीरायांकडे सोपविले.

   झाले प्राथमिक अनुमती आणि मार्गदर्शन मिळाले. आता जीवन कार्यासाठी आत्म‍उन्‍नती करण्याकरीता बारा वर्षे पुरश्चरण करण्याचा निश्‍चय करण्यात आला, त्यासाठी तपोवनाजवळील टाकळी गावांजवळील गोदावरी नंदिनी नद्यांच्या संगमात कमरेभर पाण्यात उभे राहून सूर्योदया पासुन मध्यांन्हीपर्यंत पुरश्चरण करावयाचे नंतर पंचवटीस जाऊन पाच घरी कोरडी मादुकरी मागून त्याचा रोट बनऊन श्रीरामरायास नैवेद्य दाखऊन नंतर स्वत: ग्रहण करावयाचे. दुपारी कुणा पंडिताकडे जाऊन अध्ययन करायचे. संध्याकाळी टाकळीस जाऊन नंदिनी नदीच्या काठावरील गुहेसारख्या जागेत ध्यान-धारणा लेखन करुन दिवस भराचे कार्य संपावयाचे असे ठरले.

   ही जागा निवडण्यास एकांत, संगमा सारखी पवित्र जागा, रहाण्यास गरजेपुरता आवश्‍यक असलेला अडोसा आणि मुख्य म्हणजे दररोज चालत जाऊन नियमीतपणे श्री रामरायांचे दर्शन करता येईल इतके अंतर हीच मुख्य कारणे असतील.

   माघ शु. सप्तमी (रथसप्तमी) शके १५४२ सन १६२० रोजी नारायणाने गोदा नंदिनीच्या संगमात पुरश्चरणास प्रारंभ केला. साधारण १६२२-२३ मधे टाकळी गावाजवळील दसक पंचक गावातील गिरधर कुलकर्णी यांचे देहावसन झाले. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी व त्यांचे बरोबर सती जाण्यासाठी त्यांच्या पत्‍नी अन्‍नपूर्णा ह्‍या संगमाजवळ आल्या. त्या वेळेस नारायणाने गिरधरपंतांना नवजीवन प्राप्त करुन देऊन त्यांना दहा मुले होतील असा आशिर्वाद दिला त्यावरुन त्यांना दहा मुले होऊन त्यांचे नांव दशपुत्रे असे झाले. ही दशपुत्रे घराणी आजही नाशिक व त्रिंबकेश्वरी वास्तव्य करीत आहेत. ह्या प्रकारानंतर नारायणाचा महिमा सर्वदूर प्रसरला. सर्व त्यांना श्री समर्थ म्हणू लागले. श्री समर्थ मात्र श्री रामरायांना समर्थ म्हणून संबोधीत. नंतर त्या उभयतास पहिला मुलगा झाला. तो त्यांनी श्री समर्थ चरणांवर ठेवला. त्याचे नाव श्री समर्थांनी उध्दव असे ठेऊन यथा अवकाश त्याची मुंज पण लावली. त्या नंतर तो साधारण श्री समर्थांपाशी राहत असे.



   सन १६३० मधे शहाजी राजे नाशिक मुक्‍कामी आले असताना त्यांचे कानावर श्री समर्थांची महती आली. श्री समर्थांना भेटण्यास शहाजीराजे निवडक साथीदारांसह टाकळीस आले. श्री समर्थांनी यथायोग्य त्यांचे स्वागत केले. त्या नंतर त्या दोघांची श्री समर्थ ज्या ठीकाणी राहत होते त्या गुहेत तत्‌कालीन स्थितीवर चर्चा झाली. स्वराज्य निर्माण करण्याची ज्योत ह्‍याच टाकळी तपोभूमीत पेटविण्यात आली.

फाल्गुन १९३२ रोजी पुरश्चरणाचा संकल्प पूर्ण झाला. चैत्र पौर्णिमा (श्री हनुमान जयंती) १६३३ ला श्री समर्थांनी टाकळी येथे आपल्या जीवन कार्यातील पहिल्या श्री गोमय हनुमानाची मुर्ती स्वहस्ते निर्माण करुन प्रतिष्ठापना केली.

    अशा रितीने श्री समर्थांचा पहिला मारुती, पहिला मठ टाकळी, पहीले मठाधिपती श्री उध्दव स्वामी, पहिले शिष्य श्री उध्दव स्वामी अशा रीतीने सर्वप्रकारे पहिले स्थान असलेले रामदासी संप्रदायाचे प्रथम क्रमांकाचे स्थान म्हणजे तपोभुमी टाकळी. तपश्चर्येमुळे आत्मिक सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर समस्त हिंदू समाजाची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी ह्‍या कर्तुत्ववान समाजाची अधोगती कोणत्या कारणांनी झाली हे जाणून घेऊन त्यांना पुन्हा त्यांचा सुवर्ण संपन्‍न इतिहास प्रात्प करण्यास उद्युक्‍त करण्यासाठी, श्री समर्थांनी हिंन्दुस्तान परिभ्रमणास प्रयाण केले.

   त्या नंतरचे श्री समर्थांचे कार्य आणि वास्तव्य कृष्‍णातीरीच होते. श्री उध्दवस्वामीच श्री समर्थ ज्या ठिकाणी असतील तिथे जाऊन सर्व वृतांत सांगून पुढील कार्याच्या सूचना घेत.

   अशा रितीने टाकळी मठात ब्रम्हचारी व्रताचे पालन करुन रामदीसी संप्रदायाचा प्रचार, प्रसार करण्याची परंपरा सुरु झाली. श्री उध्दवस्वामींकडे इंदरबोदन (निजामाबाद)आंध्रप्रदेश येथील मठाचे मठाधिपती पदाची नेमणूक करुन त्यांना दोन मठाची जबाबदारी देण्यात आली.

   श्री उध्दवस्वामींचे निर्याण फाल्गून शु.१ सन १७०९ रोजी सूर्योदयास झाले. त्यानंतर श्री भीम स्वामी मठाधिपती म्हणून कार्य बघू लागले. मठाचे, मंदिराचे महत्व जाणून श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे ह्‍यांनी श्री भीम स्वामींना संपूर्ण टाकळी गांव देवस्थानाचे व्यवस्थेसाठी इनाम म्हणून सनद करून दिले.


इनाम पत्र

हरिभक्‍त परायण भीम गोसावी रामदासी वास्तव्य मौजे आगर टाकळी, पा.नासिक यांस,
श्री सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार, सु॥ सन आर्बा खमसेना मया व अलफ तुमी हुजूर को पुणाचे मुकामी येऊन विनंती केली की, मौजे मजकुरी श्री देवाचा मठ आहे. त्यास पूजेस व मोहोछायास चालवावयाबद्दल नूतन गाव इनाम करार करुन दिल्हा पाहिजे, म्हणून त्याज तुम्ही थोर जाणोन देवाचे उछाहाबद्दल मौजे आगर टाकळी, पा. नासिक हा गाव इनाम स्वराज्य व मोगलाई कुलबाब कुलकानू हालीपट्टी व पोस्तर पटी खेरीज हकदार इनामदार करुन तुम्हांस मौजे मजकूर इनाम दिल्हा आहे. तरी मौजे मजकुराचा अमल तुम्ही आपले दुमाला करुन घेऊन श्री देवाची पूजा व मोहछाव करुन सुखरूप रहाणे, जाणीजे छ२६ जिल्हेज आज्ञा प्रमाणे.

श्री
राजा शाहू नर पति
हर्षनिधान बाळाजी
बाजीराव प्रधान.
इनाम पत्र धनत्रयोदशी १६७५ (ऑक्टोबर इ.स. १७५३)

   त्यानंतर मठाची खूप भरभराट झाली दोन मजली इमारत उभी राहिली. दूध दुभते, भांडी कुंडी, गाई म्हशी, जनावरे असलेला सुसंपन्‍न मठ दिमाखात उभा राहिला.

   सन २०१२ पर्यंत एकूण नऊ मठाधिपती झाले. ते असे श्री उध्दवस्वामी, श्री भीमस्वामी, श्री शिवरामस्वामी, श्री रामचंद्रस्वामी, श्री गोविंदरावस्वामी, श्री रघुनाथस्वामी, श्री गंगारामबुवा, श्री नारायणबुवा, श्री दिनकरबुवा.

   पहिल्या आठ मठाधिपतींच्या समाध्या मंदिराजवळच गोदावरीकाठी आहेत. त्या जागेचा मालकी हक्कासंबंधी प्रकरण न्याय प्रविष्‍ट आहे. त्या जागेत कुंपण घालून दर्शनार्थींना दर्शन करण्यास, पूजा अर्चा करण्यास अडकाठी आणली आहे. आता समाध्यांमधून मोठ मोठी झाडे उगवली असून सर्व समाध्या उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. लवकर निर्णय लागला नाही तर हा महाराष्‍ट्राचा अमूल्य ठेवा नामशेष होऊन जाईन.

   पहिल्या सात मठाधिपतींनी व्रताचे पालन करीत आप-आपल्या परिने मठाची, संप्रदायाची उन्‍नती केली. नारायण बुवापासून मठास उतरती कळा लागली. ब्रम्हचर्य व्रताची परंपरा असून त्यांनी लग्न केले त्यांना एक मुलगी सुध्दा झाली.

   नारायण बुवाच्या वृध्दावस्तेत आणि त्यांनी नेमलेल्या दिनकर बुवाच्या अज्ञान काळांत नारायण बुवाने पाच पंचांची मठाचा कारभार बघण्यास नियुक्‍ती केली. पाच पंचांच्या काळात नवीन मठ बांधण्याचा उद्देशाने जुना दुमजली मठ पूर्णपणे पाडण्यात आला. उरला फक्‍त १०'*१०' चा देवाचा गाभारा. ह्‍यानंतर गांवकऱ्यांनी कोर्टात दाव दाखल केला. ह्‍याच काळात दिनकरबुवा सज्ञान झाला आणि नारायण बुवाने त्याचे मृत्यु पत्रात नमूद केल्याप्रमाणे दिनकर बुवा सज्ञान झाल्या कारणाने पांच पंचांनी राजीनामे दिले. दिनकर बुवाने कोर्टात लेखी कबुल केले की मी पंचांकडून मठ संबंधीचे जमा खर्चाचे हिशोब पत्रक घेऊन कोर्टास सादर करीन ह्‍या वरुन कोर्टाने दावा रद्द केला.

   त्यानंतर दिनकर बुवाने कबूल केल्याप्रमाणे हिशोब पत्रक कोर्टात सादर केले नाही. त्यानंतर देवस्थानात अनेक बेकायदेशीर व्यवहार सुरु झाले. देवस्थानाचे दैनंदिन, मासिक, वार्षिक उत्सव, धार्मिक विधी, दररोजची दिवाबत्‍ती सगळे, सगळे थांबले.

   मठास पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी १९७० साली श्री समर्थ सेवा मंडळ नाशिकची स्थापना होऊन त्यांनी सतत ४२ वर्षे पाठ पुरावा केल्यामुळे दि.२०.१२.२०१२ रोजी कायदेशीर करवाई पूर्ण होऊन सर्व देवाचे देवाला मिळाले. आणि सात विश्वस्तांची नेमणूक आणि घटना (स्कीम) करुन देण्यात आली.

मध्यंतरीचा काळात सर्व भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा झालेला ऱ्हास थांबऊन नित्य पुजा, अर्चा, धार्मिक विधी, उत्सव, सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांचे मनाचे श्लोक, पाठांतर स्पर्धा, वक्‍तृत्व व सूर्य नमस्कार स्पर्धा, बक्षीस समारंभ, परिसराचे सुशोभी करण करुन मंदिराचा काया पालट केला.

॥ श्री राम जयराम जय जय राम ॥